नित्योपचार पूजा
जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील श्री क्षेत्र खामुंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर कुशीत बसलेले आहे. या गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचे मंदिर ३०० ते ३५० वर्षापूर्वीचे असून श्री काळभैरवनाथांची स्वयंभू मुर्ती आहे. श्री क्षेत्र खामुंडी व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच नवसाला पावणारा देव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. श्री काळभैरवनाथांच्या सेवेसाठी वार्षिक नियमित कार्यक्रम होतात.
श्री नाथांची आरती पहाटे ४.०० वा. व सायंकाळी सुर्यास्ताच्यावेळी नियमितपणे केली जाते. त्याचप्रमाणे मंदिरातील नंदादीप आवरित ३०० वर्षापासून एक क्षणभर न विझता चालु आहे. पंचक्रोशीतील भाविक श्री नाथांच्या श्रद्धेपोटी होणाऱ्या सर्व उत्साहात भाग घेतात. श्री नाथांच्या सेवेमध्ये वार्षिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक एकादशीला श्री काळभैरवनाथ भजनी मंडळाचे भाजण मंदिरामध्ये होते.
कार्तिक स्थानानिमित्त एक महिनाभर पहाटेच्या काकड्याचे आयोजन केले जाते. तसेच चैत्र शुद्ध चतुर्दशी व पोर्णिमा या दिवशी मोठ्या उत्सवात यात्रा भरते. त्यामध्ये आरती, देवास अभिषेक, तळीभजन देवास पोषाख, मांडव डहाळे, शेरण्यांचा कार्यक्रम, श्री नाथांची पालखी व काठी मिरवणूक, करमणुकीचा कार्यक्रम तसेच कुस्त्यांचा जंगी आखाडा याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तसेच दसऱ्याच्या दिवशी श्री नाथांची पालखी सोहळा मोठ्या उत्सवात पार पडतो. कार्तिक वध्य द्वितीया ते कार्तिक वध्य नवमी श्री काळभैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य प्रमाणात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सात दिवसांच्या कालावधीमध्ये आरती,काकडा, गाथा भजन, नियमाचे भजन, अखंड विणा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून कार्तिक वध्य कालाष्टमिला श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव रात्रो ११.०० वा.साजरा केला जातो.नंतर रात्रो १३ ते पहाटे ४ वा. भव्य मिरवणूकीने श्री नाथांच्या पालखी सोहळा मोठ्या उत्साहात होतो. सकाळी ९ ते ११ वा. काल्याच्या कीर्तनानंतर कालामहप्रसादाचे आयोजन केले जाते. याप्रमाणे श्री काळभैरवनाथांची सेवा पिढ्यान पिढ्या भाविक करत आले आहेत.
श्री काळभैरवनाथ पौराणिक कथा